वाहतूक हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले अचलपूर येथील आमदार बच्चू कडू यांना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला.
आमदार कडू यांनी यापूवीं अटकूपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज केला होता. तेव्हा त्यांना चार मे रोजी कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दरम्यान, वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर स्थगिती द्यावी आणि जामीन मंजूर करावा, अशी विनंती हायकोर्टाला करण्यात आली. तेव्हा कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.
आमदार कडू त्यांच्या साथीदारासह २४ मार्च रोजी पतवाडा येथील एस.टी. डेपो चौकातून संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास जात असताना मार्गात काही खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या असलेल्या त्यांना दिसल्या. तेव्हा त्या बसेसवर कारवाई का करीत नाही, अशी विचारणा आमदार कडू यांनी वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना केली. मात्र, त्यावर सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने कडू यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप शिपायाने केला. याप्रकरणी कडू यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२, १८६, २९४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट