शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांत तीन मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. या तिन्ही शस्त्रक्रिया करताना सुपरला सीव्हीटीएसचे शल्यचिकित्सा गृह उधारीवर वापरावे लागले. त्यामुळे येथे तातडीने मॉड्युलर ओटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासोबतच मेडिकल आणि सुपरमधील शल्यक्रियागृहांच्या आधुनिकीकरणासाठी सात ऑपरेशन थिएटर्सना मंजुरी देण्यात आली. मात्र, या सातपैकी किडनी प्रत्यारोपणाच्या मॉड्युलर ओटीला डावलून मेडिकलधील सर्जरीच्या ओटीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे किडनी रुग्णांना पुन्हा एकदा वेटिंगवर राहावे लागणार आहे.
मेडिकलचे पाच व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन असे मिळून सात शस्त्रक्रिया गृह (ऑपरेशन थिएटर) १४ कोटी रुपये खर्चून अद्ययावत (मॉड्युलर) होणार होते. परंतु, सहा महिन्यांवर कालावधी होत असताना प्रत्यक्ष कामालाच सुरुवातच झालेली नाही. युरोलॉजी विभागाला स्वत:चे ऑपरेशन थिएटर नसल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) अडचणीत आले आहे.
मेडिकलमधील पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटींमधून १४ कोटीच्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरला सहा महिन्यांपूर्वी प्रशासकीय मंजुरी मिळाली. निविदाही निघाल्या. राज्याबाहेरील एका एजन्सीला हे काम मिळाले. या कामाची सुरुवात किडनी ट्रान्सप्लांटसाठी युरोलॉजी विभागाच्या ऑपरेशन थिएटरपासून होणार होती. सोबतच सुपरच्या न्युरोसर्जरीच्या ऑपरेशन थिएटरचे काम होणार होते. यात आतून स्टीलचे पत्रे लावून 'ओटी' बॅक्ट्रीया फ्री केले जाणार होते. शस्त्रक्रियेच्यावेळी संसर्ग होण्याचा धोकाही कमी होणार होता. विशेष तंत्रज्ञानाचा येथे उपयोग होणार असल्याने शस्त्रक्रियेमध्ये अचूकता येणार होती.
या घडामोडीत किडनीला डावलून सर्जरीच्या ओटीला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक मेडिकलमधील सर्जरी विभागासाठी आधीच तीन ओटी कार्यरत आहेत. त्यात ओटी क्रमांक ए, सी आणि एफचा समावेश आहे. अशा स्थितीत किडनी प्रत्यारोपणासाठी सुपरच्या मॉड्युलर ओटीच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र युरॉलॉजी विभागाला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांना मात्र पुन्हा एकदा ताटकळत राहावे लागणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट