नागपूर महानगर क्षेत्रामध्ये नऊ तहसीलमधील ७२१ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याखाली ३५६७ चौरस किलोमीटर क्षेत्र येते. २०११ च्या जनगनणेनुसार नागपूर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १०.६२ लाख आहे. या महानगर क्षेत्राचा नियोजनपद्धतीने विकास व्हावा म्हणून नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणाऱ्या नासुप्रने २६ फेब्रुवारी २०१५ रोजी महानगर विकास आराखडा प्रसिद्ध केला. आराखड्यावर नागरिकांचे आक्षेपही मागविण्यात आले होते. ६ हजारांपेक्षा जास्त आक्षेप नोंदवून नागरिकांनी आराखड्याला विरोध दर्शविला. या आक्षेपांची सुनावणी होऊन त्याचा अहवाल २१ जूनच्या बैठकीत मांडण्यात आला. नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने आराखड्याला ग्रीन सिग्नल दिल्याने पुढील मार्ग आता सुकर झाला आहे. प्रारूप विकास योजना नागपूर महानगर नियोजन समितीच्या मान्यतेकरिता सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर शासनास अंतिम मंजुरीकरिता सादर करण्यात येणार आहे.
विकासाचे चित्र रंगविणाऱ्या इंग्लंडच्या हॉलक्रो कंपनी आराखड्यात अनेक चुकाही केल्या. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाला धोका पोहचविणारा आराखडा असल्याची टीकाही विविध संघटनांनी केली. शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचे अस्तित्व संपुष्टात आणणारा आराखडा असल्याची टीका झाली. विकास आराखड्यात शेतकऱ्यांच्या जमिनींवर ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आल्याने त्यांचा विरोध आहे.
असा रंगविला विकास...
३८ हजार १८० हेक्टर जमीन गृहबांधणीसाठी.
१२ ठिकाणी ट्रक टर्मिनल्सही आणि ८ ठिकाणी खाजगी वाहनांसाठी पार्किंगसाठी जागा
४३ किलोमीटरचा नवीन रिंगरोड
नागपुरात एमआरटीएस (मास रॅपीड ट्रान्झीट सिस्टीम).
डोंगरगाव येथे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब
महानगर क्षेत्रात उद्योगांसाठी १०१.२० चौरस किलोमीटर जागा
बस डेपोसाठी २ ठिकाणी ७.६९ हेक्टर जागा आरक्षित
मेट्रो रेल्वे बुटीबोरीपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित
ट्रान्सपोर्ट हबसाठी २८ हेक्टर जागा आरक्षित
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट