चेनस्नॅचिंग, घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासात नागपूर पोलिस अपयशी ठरत असल्याचे वृत्त 'मटा'ने दिले होते. त्यात गेल्या वर्षभरातील घडलेले गुन्हे आणि झालेला तपास याची सविस्तर आकडेवारीच सादर करण्यात आली होती. 'मटा'ने दिलेल्या व़ृत्ताची पोलिस आयुक्त यादव यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत दखल घेतली. तसेच शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने तपास करण्याचा आणि गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्याचा आदेश दिला. दरम्यान, प्रभारी अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी शहरातील चालू वर्षात झालेल्या गुन्ह्यांचा आढावा पोलिस आयुक्तांकडे सादर केला. त्यात अनेक गुन्ह्यांचा सरासरी २० ते २५ टक्केच तपास होत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्या गुन्ह्यांचा तपास अधिक कसा वाढविता येईल, त्यावर बैठकीत गंभीर चर्चा करण्यात आली. विशेषतः चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी आदी गुन्ह्यांवर प्रतिबंध कसा घालता येईल, त्यावर पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांबाबत तसेच गुन्हे घडू नयेत, याकरिता कठोर उपाययोजना कराव्यात, असा आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, तपासाचा वेग आणि प्रमाण वाढवीत असतानाच आरोपींना न्यायालयातूनदेखील शिक्षा व्हावी, त्यांच्याविरुद्धचा दोष सिद्ध झाला पाहिजे, असा आदेशही आयुक्तांनी दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट