नागपूर ः गेल्या वर्षी देशात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेने देशातील उद्योग जगताचे मोठे नुकसान केले. त्यामुळे या समस्येकडे देशाच्या उद्योग जगतापुढील सगळ्यात मोठा धोका म्हणूनही बघितली जाते. 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज'च्या (फिक्की) 'इंडिया रिस्क सर्वे २०१६' मधून हे सत्य बाहेर आले आहे. जाट, पटेल या समुदायांची आंदोलने, सामाजिक अस्वस्थता, संप, भूसंपादनाविरुद्ध आणि काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांविरुद्ध झालेली आंदोलने या बाबींनी २०१६च्या धोक्यांच्या यादीत पहिले स्थान मिळविले आहे.
दरवर्षी फिक्कीतर्फे देशातील उद्योग जगताच्या अर्थव्यवस्थेसमोरील धोक्याबाबत सर्वेक्षण करण्यात येते. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात भ्रष्टाचार, लाचखोरी आणि कॉर्पोरेट जगतातील घोटाळे या बाबी पहिल्या क्रमांकावर होत्या. परंतु आश्चर्यजनकरित्या यंदा या बाबी पाचव्या क्रमांकावर घसरल्या आहेत. धोक्यांच्या या यादीत सायबर क्राईमला दुसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. देशातील व्यवसायाला गेल्या दोन वर्षांपासून या घटकांपासून बरेच नुकसान झाले आहे. सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांवरील सायबर हल्ले वाढले आहेत. अर्थव्यवस्था 'ग्लोबल' होत असल्याने माहिती व तंत्रज्ञानावरील निर्भरता वाढली आहे. त्यामुळे सहाजिकच त्यातून येणारे धोकेसुद्धा वाढले आहेत. देशातील वाढती गुन्हेगारीने या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी लक्षात घेतासुद्धा गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येते. महिलांवरील अत्याचाराच्याही घटनांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात येते. गेल्या वर्षीच्या धोक्यांच्या यादीत दहशतवाद आणि घुसखोरी हा घटक तिसऱ्या क्रमांकावर होता, यंदा या घटकाची घसरण झाली असून तो आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. यात 'आयसीस'ची भारतातील वाढत असलेली व्याप्ती मात्र चिंतेचा विषय ठरत आहे. तसेच माओवाद हासुद्धा आजही एक महत्त्वाचा धोका आहे. खनिजांच्या दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध अशा राज्यांमध्ये त्यांचे अस्तित्व हे उद्योग जगाच्या अर्थव्यवस्थेकरिता अत्यंत त्रासदायक मानले जात आहे. राजकीय आणि प्रशासकीय अस्थिरता हा धोका सहाव्या क्रमांकावर आला आहे.
भारतीय उद्योगाची प्रगती
परंतु या धोक्यांमध्येसुद्धा भारतीय उद्योग जगताची प्रगती ही आशियातील अन्य देशांपेक्षा समाधानकारक मानली जात आहे. जागतिक बँकेच्या दृष्टिकोनातून २०१४ मध्ये भारताचा क्रमांक हा १३४ वा होता. २०१५मध्ये तो १३० वा झाला आहे.
सामाजिक अस्वस्थतता
-सामाजिक अस्वस्थतता -सायबर क्राईम -गुन्हेगारी -दहशतवाद आणि घुसखोरी -भ्रष्टाचार, लाचखोरी आणि कॉर्पोरेट घोटाळे -राजकीय आणि प्रशासकीय अस्थिरता -नैसर्गिक आपत्ती -आग -बौद्धिक संपदा चोरी -औद्योगिक क्षेत्रातील गुप्तहेरी -सामाजिक शोषण आणि कार्यालयीन हिंसाचार -अपघात
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट