म. टा. प्रतिनिधी, वर्धा
महात्मा गांधी यांच्या वास्तव्याचा इतिहास सांगणाऱ्या पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. बंदीनंतर आजही जिल्ह्यात दारू मुबलक प्रमाणात मिळते. दारूच्या हातभट्ट्या नजरेस पडतात. सेवाग्राम परिसरात दारूभट्टी राजरोसपणे सुरू असल्याचे वास्तव 'मटा'ने शुक्रवारी सचित्र समोर आणले. प्रशासनावर टीकेची झोड उठली. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत संपूर्ण सेवाग्राम परिसर पिंजून काढला व दारूभट्टीवर छापा मारत ती उद्ध्वस्त केली. सेवाग्राम ते वर्धा रेल्वेमार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही दारूभट्टी बिनधास्तपणे सुरू होती. एका सजग प्रवाशाने गुरुवारी सकाळी या दारूभट्टीचे वास्तव टिपले.
'मटा'च्या माध्यमातून वास्तव समोर आणले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी हा दारूअड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी सेवाग्राम पोलिस ठाण्यातील बारवाल यांच्या नेतृत्त्वात पथक तयार केले. या पथकाने सेवाग्राम रेल्वेलाइन, रेल्वे स्टेशन व बरबडी या गावातील झुडपी जंगलाचा शोध घेतला. फोटोंच्या आधारे घटनास्थळ शोधण्यात आले. संपूर्ण परिसर दारूमुक्त करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. त्यातच सेवाग्राम रेल्वे लाइनलगतच्या नाल्याच्या काठावर दुपारी १ वाजताच्या सुमारास हा दारूअड्डा दिसून आला. बुरड मोहल्ल्यातील रामा आडे येथे दारू काढत होता. घटनास्थळावरून आठ ड्रम, चार छोटे ड्रम, सहा छोट्या कॅनसह १ लाख १८ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. तर आडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही सर्च मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिल्याने अवैध दारूविक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
दारूबंदीमुळे दारू नक्कीच कमी झाली आहे. पण, शंभर टक्के बंद झालेली नाही. अंमलबजावणीत कुठेतरी कमी पडतोय. दुकाने बंद झाली. पण, वर्ध्यात पिण्याचे परवाने सुरूच आहेत. म्हणून दारू दुकाने बंद करून काहीही साध्य होणार नाही. तर सरकारने दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी सक्रिय पावले उचलण्याची गरज आहे.
-डॉ. अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
वर्धा जिल्ह्यात केवळ दारू दुकानाचे परवाने बंद करण्यात आले. परवानाधारकाला दिवसाकाठी १२ बाटल्या बाळगण्याची मुभा आहे. त्याचा गैरवापर होत आहे. येथे चंद्रपूर पॅटर्न राबविण्याची गरज आहे.
-अॅड. पारोमिता गोस्वामी दारूबंदी चळवळीतील आंदोलनकर्त्या
सेवाग्राममधील दारूभट्ट्या बंद झाल्या असल्या तरी दारूविक्री सुरूच आहे. आता या तिन्ही जिल्ह्यांतील दारूबंदीची अंमलबजावणी अतिशय सक्षमपणे होणे आवश्यक आहे. 'मटा'ने हा विषय पुन्हा चर्चेत आणून चांगले काम केले आहे.
-जयवंत मठकर अध्यक्ष सेवाग्राम अाश्रम प्रतिष्ठान
सेवाग्राम परिसरातील दारूभट्टी उद्ध्वस्त करण्याचे आदेश शुक्रवारी दुपारी दिले. जिल्ह्याच्या इतर भागातही मोहीम राबविण्यात आली. सुमारे अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. यापुढे अशा भट्ट्या निदर्शनास येणार नाहीत याची खबरदारी घेणार.
- अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक वर्धा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट