सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार खपवून घेतला नाही, जनतेकडे अशी प्रकरणे असल्यास त्यांनी माझ्याकडे पाठवावी, तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
गडकरी यांनी नागपूर सुधार प्रन्यास डॉ. दीपक म्हैसेकर आणि वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा या प्रमुखांशी शनिवारी वाड्यावर 'वन टू वन' चर्चा केली. डॉ. म्हैसेकर यांच्यासोबतच्या बैठकीत गडकरी यांनी सी-प्लेन, घरकुल योजना तसेच, शहरातील अन्य प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. प्रन्यासच्या कामांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सर्वसामान्यांची कामे होत नाही आणि अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नसतो. यापुढे कामे प्रलंबित ठेवता कामा नये तात्काळ निकाली काढावी, अशी सूचना गडकरी यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागरिकांकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे असल्यास त्यांनी माझ्याकडे द्यावी, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बैठक घेऊन प्रन्यासशी संबंधित प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे गडकरी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वेकोलिने गेल्या २१ महिन्यांत रेकॉर्डब्रेक काम केले आहे. ४ हजार ६०० हेक्टर भूसंपादन केले. सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांचा मोबदला दिला व एक हजार ९०० लोकांना रोजगार उपलब्ध झाला. वेकोलिच्यावतीने खाणीलगतच्या गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
वेकोलिचे काम यापूर्वीही चांगले होते, याकडे लक्ष वेधले असता, 'काँग्रेसच्या काळात वेकोलित चुकीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. बोगस कामे करून पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला. त्यामुळे वेकोलित चांगली कामे होत नव्हती. नवीन सरकार आल्यापासून वेकोलिसह बऱ्याच विभागांमध्ये सुधारणा झाली व कामेही चांगली होत आहेत', असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
कोळशापासून युरिया कोळशापासून लवकरच युरिया उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार कोळसा खाण देईल. राज्य सरकार खासगी कंपनीच्या सहकार्याने युरियाचे उत्पादन करेल. त्यातून शेतकऱ्यांना कमी भावात युरिया उपलब्ध होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोळशापासून युरिया उत्पादनाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. अमेरिका आणि चीनमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोळसा जाळून व अन्य तंत्रज्ञानाचा वापर करून युरियाचे उत्पादन करता येऊ शकते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट