नागपूर ः 'लष्कराकडे दारूगोळा कमी असण्याच्या स्थितीत आता बरीच सुधारणा झाली आहे. पण तसे असले तरी ही दरी भरून निघायला आणखी तीन वर्षे लागतील', अशी महत्त्वाची माहिती लष्कराच्या आयुधांचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल रवी थोडगे यांनी दिली. संरक्षण क्षेत्रासंबंधीच्या सेमिनारप्रसंगी थोडगे यांच्याशी 'मटा'ने या विषयी विशेष चर्चा केली.
लष्कराच्या आयुध विभागाचे मास्टर जनरल व मूळ विदर्भातील असलेले रवी थोडगे अलीकडेच निवृत्त झाले. पण, संरक्षण विभागाने आयुध निर्मिती क्षेत्रात खासगी क्षेत्राला आणण्याची योजना आखली. त्या पार्श्वभूमीवर आयोजित सेमिनारच्या निमित्ताने थोडगे यांनी विशेष माहिती दिली.
लष्कराचा मुख्य मुद्दा दर्जा असतो. खासगी क्षेत्राकडून शस्त्र सामग्री घेताना हा मुद्दा कसा सोडविणार? याबाबत ते म्हणाले की, 'लष्करासाठी दर्जा हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राला संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये आणताना विविध पातळ्यांवर मार्गदर्शन दिले जात आहे. पण सोबतच लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील अनेक युवा उद्योजक मात्र हिरीरीने समोर येत असल्याचे दिसून येत आहे. ही आनंदाची बाब आहे.' शस्त्र सामग्री पुरवठ्यासाठी संरक्षण विभागाने खासगी क्षेत्राला हाक दिली आहे. त्याचवेळी देशातील ऑर्डनन्स फॅक्टरींचा दर्जा दिवसेंदिवस कमी होत असल्याचेदेखील बोलले जात आहे. यामुळे आता पुढील १० ते १५ वर्षात ऑर्डनन्स फॅक्टरीजची जागा खासगी क्षेत्र घेणार का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ऑर्डनन्स फॅक्टरीजचे महत्त्व आजही अबाधित असल्याचे सांगितले. 'खासगी क्षेत्राला शस्त्र सामग्री निर्मितीसाठी आणले जात आहे. पण ते दारूगोळा निर्मितीत नसतील. ते काम प्रमुख व तेवढेच गुप्त असल्याने सध्या आणि भविष्यातही केवळ ऑर्डनन्स फॅक्टरीजच करेल.
पण दारूगोळा निर्मितीव्यतिरिक्त अन्य शस्त्रनिर्मिती अथवा सुट्या भागांसाठी आयातीवर अवलंबून राहता कामा नये. आयात करावी लागणारी सामग्री देशांतर्गत खासगी कंपन्यांनी निर्मिती करावी', असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पुलगाव अपघात खराब दर्जामुळेच
पुलगाव दारूगोळा डेपोत झालेला अपघात व आगीचे तांडव हे सुरक्षेचा अभावामुळे नसून केवळ खराब दर्जाच्या दारूगोळ्यामुळेच झाला, असे लेफ्टनंट जनरल थोडगे यांनी यावेळी स्पष्ट केले. लष्कराकडून डेपोच्या सुरक्षेची इत्यंभूत काळजी घेतली जाते. त्यामुळे या अपघाताला खराब दर्जाची सामग्रीच कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.
हवाईदलालाही हवे खासगी 'व्हेंडर्स'
हा सेमिनार खासगी तसेच लघु व मध्यम कंपन्यांना सुटे भाग, कच्चा माल या स्वरुपाची सामग्री लष्करी सामग्री निर्मितीसाठी पुरविण्याच्या हेतून घेण्यात आला. त्यामध्ये केवळ आर्मीच नाही तर हवाईदलालादेखील खासगी 'व्हेंडर्स'ची गरज असल्याचे मांडण्यात आले. मेंटेनन्स कमानचे सामग्री खरेदी विभागाचे प्रमुख ग्रुप कॅप्टन जे. एस. प्रानी यांनी सेमिनारच्या एका सत्रात ही माहिती दिली. एएन ३२ वाहतूक विमानासाठी दिशादर्शनाचे काम करणारे जायरो ट्रान्समिटर असो वा, मिग २९ विमानासाठी होस अथवा इंजिन उचलणारे क्रेन, विमान दुरुस्तीसाठीचे सिम्युलेटर, हेलिकॉप्टरच्या मागील पंखांची दुरुस्ती आदींची हवाईदलाला गरज आहे. मागील काही वर्षात हवाईदलाने ४५ हजार दुरुस्तींचे स्वदेशीकरण केले आहे. आता हळूहळू या क्षेत्रात मेक इन इंडियाद्वारे पुढे जात असल्याचे प्रानी म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट