Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

अदानी प्रकल्प होणार बंद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नागपूर

राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे राज्यातील ग्रामीण भागांना पुन्हा एकदा लोडशेडिंगचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी अदानी प्रकल्पातून विजेचे उत्पादन येत्या काही दिवसात ठप्प होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पासाठी नेमके किती पाणी लागेल, याची माहिती असूनही राज्य सरकारने पाणी देण्यास तयार असलेल्या मध्यप्रदेश सरकारला कमी पाण्याची मागणी केली होती व ती मध्यप्रदेश सरकारने फेटाळून लावली होती. त्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे अदानी प्रकल्पाने पाचपैकी दोन युनिट यापूर्वीच बंद केले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानीच्या २४०० मेगावॅटच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला धापेवाडा धरणातून पाणी मिळते. मात्र, या धरणातील पाणी संपल्याने अदानीपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या बावनथडी प्रकल्पातून पाणी मिळावे, अशी मागणी अदानीने केली होती. सूत्रांच्या मते महावितरणने ऊर्जा सचिवांना १२ दशलक्ष क्युबिक मीटर पाण्याची आवश्यकता असून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात असलेल्या राजीव सागर धरणातून मिळावे, अशी विनंती केली होती. दरम्यान, महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार यांच्यातील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारने केवळ ८ दशलक्ष क्युबिक मीटर पाणी सोडण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, इतके पाणी सध्या सुरू असलेल्या तीन युनिटसलाही कमी पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाण्याच्या नियोजनाबद्दल राज्य सरकारने दाखवलेल्या अनास्थेमुळे येत्या काही दिवसात अदानीतून वीजनिर्मिती होणे बंद होणार आहे. दरम्यान, बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय आहे. सूत्रांच्या मते राजीव सागर धरणातून पाणी सोडले तरी बावनथडी नदीचे पात्र कोरडे असल्याने व सध्या वाढत्या तापमानामुळे केवळ ५० टक्के पाणीच धापेवाडा धरणात पोहोचेल. या चार दशलक्ष क्युबिक मीटर पाण्यापैकी १.६७२ क्युबिक मीटर पाणी गोंदिया जिल्ह्याला पिण्याक​रिता लागणार आहे. तसेच सुमारे ०.०५ क्युबिक मीटर तिरोडा गावाकरिता लागणार आहे. त्याचबरोबर सध्या १५०० हेक्टरवर पिके उभी असून धापेवाडा धरणातील पाण्यावरच अवलंबून आहेत. यासाठी सुमारे १.५४ दशलक्ष क्युबिक मीटर पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना मिळणारे पाणी कापून ते खासगी वीजनिर्मिती प्रकल्पाला देण्याचा निर्णय सरकार सध्या तरी घेणार नाही. त्यामुळे इतक्या ठिकाणी पाणी दिल्यानंतर प्रकल्पाकरिता अत्यंत कमी पाणी उरणार असून, यात वीजनिर्मिती करणे शक्य नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अदानी प्रकल्पातील सूत्रांच्या मते सध्या सुरू असलेल्या तीन युनिटसला ०.१२ दशलक्ष क्युबिक मीटर पाणी लागते. सध्या आमच्याकडे ०.८ क्युबिक मीटर पाणी उरले आहे. धापेवाडा प्रकल्पात सध्या १.५ क्युबिक मीटर पाणी शिल्लक आहे. मात्र, याचा फारसा उपयोग नाही. त्यामुळे सध्या आमच्याकडे केवळ सहा ते सात दिवस पुरेल इतकेच पाणी आहे तसेच मध्यप्रदेशातील राजीव सागर प्रकल्पातून पाणी मिळाल्यास आणखी आठवडाभर असे एकूण दोन आठवडे वीजनिर्मिती शक्य होऊ शकेल, असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>