त्याला शायरी लिहायचा शौक होता. मात्या-पित्यांनी विरोध करून बघितला पण तो नज्मे लिहित राहिला. संधी प्रत्येकाच्या दारी येते, तशी ती त्याच्याही दारी आली, त्याला कारणीभूत ठरले त्याचे शब्द. तनवीरच्या आतून उमटलेल्या शब्दांना साज मिळाला एका दैवी आवाजाचा... आणि हा आवाज कुणाचा? तर साक्षात महानायक अमिताभ बच्चन यांचा. तनवीर गाझी यांच्या शब्दांना 'पिंक' चित्रपटात मिळालेला 'बच्चन'साज या अमरावतीकर तरुणासाठी आता आयुष्यभराची ठेव बनून राहिला आहे.
सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू असलेल्या 'पिंक' चित्रपटातील 'कारी कारी' हे गाणे गाजत आहे. त्या जोडीने गाजत आहे एक कविता, जी चित्रपटाच्या शेवटी अमिताभ यांच्या आवाजात प्रेक्षकांना ऐकू येते.
तू खुद की खोज में निकल
तू किस लिये हताश है,
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश है!
असे अर्थवाही शब्द असलेली ही रचना तनवीर गाझी यांनी लिहिली आहे. तनवीर हे मूळचे अमरावतीकर असून मागील आठ ते दहा वर्षे मुंबईत आपल्या शब्दांच्या आधारे आपले भविष्य रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरुवातीच्या खडतर काळानंतर या ३२ वर्षांच्या या मनस्वी शायराकडे बघून त्याच्या नशिबाने दिलखुलास स्मित केले आणि 'पिंक' चित्रपटाची संधी चालून आली.
'मी लहानपणापासूनच कविता लिहायचो. माझ्या काळजीपोटी पालकांचा त्याला विरोध होता, पण मी लिहित गेलो. बऱ्याच संघर्षानंतर निराश होऊन मी अमरावतीला परत आलो. अमरावती-मुंबई फेऱ्या सुरू होत्या. काम मिळायचे, पण मनासारखे काही घडत नव्हते. दरम्यान, विक्रम भट यांच्या 'हेट स्टोरी-२' या चित्रपटासाठीही एक गाणे लिहिले. मात्र, त्यानंतरही फार काही घडले नाही'... तनवीर सांगत होते.
एक दिवस संगीतकार शंतनू मोईत्रा यांचा त्यांना फोन आला. तनवीरच्या कवितेच्या ओळी कुणीतरी मोईत्रा यांना ऐकविल्या होत्या. त्यांनी तनवीरला बोलावून घेतले आणि एक सुरावट ऐकवली. अत्यंत कमी वेळात त्यांना गाणे लिहावयास सांगण्यात आले. तनवीर यांच्या लेखणीतून ते गाणे आले... 'कारी कारी' आणि आज ते अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. त्याची दुसरी कविता मोईत्रा यांनी दिग्दर्शक शुजित सरकार यांच्यामार्फत अमिताभ बच्चन यांच्याकडे पोहोचविली. बच्चन यांनी त्यावर पसंतीची मोहर उमटवली आणि 'पिंक' चित्रपटात तिला स्थान मिळाले.
'बच्चन स्टुडिओमध्ये आले तेव्हा मी चहा पीत होतो. ते आल्याचे कळतात अर्धा चहा खाली ठेवला आणि त्यांच्या मागोमाग रेकॉर्डिंगला पळालो. त्यांनी कविता म्हटली आणि अभिनंदनही केले. हे सगळे अवर्णनीय असेच आहे', अशा शब्दांत तनवीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गुलजार, साहिर, जावेद आणि तनवीर
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील साहिर लुधियानवी यांची 'कभी कभी' ही कविता अजरामर ठरली. त्यानंतर 'सिलसिला'मध्ये जावेद अख्तर यांच्या 'नीला आसमां सो गया' तसेच गुलजार यांच्या 'भला बुरा' या गाण्याला बिग बींचा आवाज लाभला होता. या महान शायरांनंतर तनवीर गाझींचे शब्द अमिताभ बच्चन यांच्या आवाजात कोरले गेले आहेत. कुणालाही हेवा वाटावा, असा क्षण तनवीर यांच्या आयुष्यात वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी लिहिला गेला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट