म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकर याचा जामीन मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. तर कनिष्ठ न्यायालयात तात्पुरत्या जामीनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली.
शहरातील अनेक ठेवीदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून प्रशांत वासनकर याने त्यांची आर्थिक फसवणूक केली. त्याप्रकरणी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नंतर शहर गुन्हेशाखेने याप्रकरणी तपास केला आणि वासनकर याच्याविरोधात आतापर्यंत तीन आरोपपत्र दाखल करण्यात आले. वासनकर याचा जामीन कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्याने हायकोर्टातील न्या. सुनील शुक्रे यांच्या एकलपीठासमोर जामीनासाठी अर्ज केला. गुन्हेशाखेने आरोपपत्र दाखल केले असल्याने आता याप्रकरणी तपास करण्याची आवश्यकता नाही. त्यासोबतच ठेवीदारांचे पैसे परत करण्याची तयारी वासनकर याने दाखविली. त्यासाठी ३० ते ४० कोटी रुपये देण्यात येतील, असेही त्याने कोर्टाला सांगितले.
दरम्यान, सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या अटीवर सहा महिन्यांचा जामीन दिला. त्याचप्रमाणे वासनकर यालाही जामीन देण्यात यावा, अशी विनंती वासनकरच्यावतीने बाजू मांडताना अॅड. देवेन चौहान यांनी केली.
दरम्यान, वासनकर याच्या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील सागर आशिरगडे यांनी तीव्र विरोध केला. वासनकर याने ठेवीदारांचे पैसे परत करण्याची हमी दिली असली तरीही ३० ते ४० कोटी कुठून आणणार, त्याबाबत स्पष्टता नाही. त्याने आधीच पैश्यांची तरतूद केली होती तर तपास यंत्रणेला ठेवीदारांचे पैसे परत करण्यास सहकार्य का केले नाही, असा सवालही त्यांनी केला. याप्रकरणी अद्यापही तपास सुरू आहे. वासनकर याने तब्बल १६० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे त्यात निष्पन्न होत आहे. त्यामुळे तितका पैसा परत करण्यासाठी काय तरतूद आहे, त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. कनिष्ठ न्यायालयात गुन्हेशाखेने वासनकर याच्या आर्थिक व्यवहाराची माहिती सादर केलेली आहे. त्यात कोणत्या बँकेत किती रक्कम आहे त्याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयातच त्याच्या हंगामी जामीनाबाबत निर्णय होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले. त्यामुळे हायकोर्टाने वासनकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. गुन्हेशाखेच्यावतीने विधी अधिकारी स्वप्नील अलोणी यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट