Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

‘हंटा’मुळे धोक्याची घंटा; उपराजधानीत यंत्रणाच नाही

$
0
0

नागपूर : उंदराच्या मलमूत्रातून हंटा व्हायरसची लागण झाल्याने राज्याची राजधानी मुंबईत एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. दुसरीकडे उपराजधानीतही उंदरांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे या हंटा व्हायरसचा संसर्ग होण्याची भीती वाढत आहे. याचा उद्रेक झाल्यास परिस्थिती हाताळण्याची कोणतीही यंत्रणा उपराजधानीत नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे प्राण्यांकडून माणसांना आणि माणसांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ झुनोटिक सेंटरचा प्रस्ताव सात वर्षांपासून रेंगाळला आहे. त्यामुळे या विषाणूची लागण झाल्यास शहराचे आरोग्य धोक्यात येईल, अशी दाट शक्यता आहे.

गेल्यावर्षी स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, रोटा, लेप्टोस्पायरोसिस या विषाणूजन्य आजारांनी राज्याला विळखा घातला होता. त्यानंतर आता उंदरांमुळे पसरणाऱ्या हंटा व्हायरसची दहशत उपराजधानीवर घोंघावू लागली आहे. हंटा विषाणूंची लागण झाल्यामुळे मुंबईत शनिवारी कलिना भागात एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हंटा हा विषाणू उंदरांची विष्ठा, मुत्रातून पसरतो. त्याची लागण झाल्यास तीव्र ताप, खोकला, श्वसनाचे विकार जडतात. रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा विषाणू शरीरावर ताबा मिळवीत एकएक अवयव निकामी करत जातो. हा व्हायरस झुनोटिक प्रकारातला आहे. अशा आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) सेंटर फॉर झुनोटिक डिसीज हा प्रकल्प राबविला जातो. मुंबईत सुरू असलेल्या हंटा व्हायरसच्या दहशतीमुळे उपराजधानीतल्या परिस्थितीचा आढावा घेतला असता याला आवर घालण्यासाठी यंत्रणा आणि मनुष्यबळच नसल्याची माहिती समोर आली.

माफसूतल्या प्रकल्पात प्राण्यांकडून माणसांना आणि माणसांकडून प्राण्यांना संक्रमित होणाऱ्या पाचच आजारांच्या विषाणूंचे वर्गीकरण होते. यात ब्रुसेल्ला, लेप्टोस्पायरोसिस, ट्युबरक्युलोसिस, लिस्पेरिओसिस, स्क्रब टायफस, रोटाव्हायरसचा समावेश आहे. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, इबोला आणि आता हंटाच्या निदानासाठी यंत्रणा उपराजधानीकडे नाही. सध्या महाराष्ट्रातील पुणे आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथे अशी प्रयोगशाळा आहे. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजिकल आणि भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅनिमल हेल्थ अॅण्ड हाय स्पेशालिटी डिसीज या दोनच केंद्रांत झुनोटिक आजारांचे वर्गीकरण होते.



प्रस्ताव धूळखात

जगभर मनुष्यांना १४०५ प्रकारचे आजार जडतात. त्यापैकी ५८ टक्के म्हणजे ८१७ आजार हे पशूंच्या संपर्कातून होतात. त्यापैकी १७७ जंतुसंसर्ग नव्याने उग्र रूप धारण करतात. देशात ४० प्रकारचे आजार पशूंकडून माणसात आणि माणसांकडून पशूंकडे संक्रमित होतात. यावर संसोधन करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ झुनोटिक डिसीज हे केंद्र नागपुरात सुरू होणार होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि पशुचिकित्सा परिषदेच्या समन्वयातून हे राष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू होणार होते. मात्र, प्रस्ताव पाठवून सात वर्षे झाली तरी त्याचा एकही कागद पुढे सरकलेला नाही. त्यात आता हंटाचा प्रादुर्भाव झाल्यास शहर व्हेंटिलेटवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


असा पसरतो आजार ...
उंदीर चावल्यामुळे किंवा उंदराचे मलमूत्र मिसळलेल्या पाण्याशी संपर्क आल्यामुळे, त्वचेवाटे हा आजार पसरतो.


लक्षणे

-सतत तीव्र ताप येणे

-खोकल्यातून रक्त पडणे

-श्वासोच्छ्वासात त्रास होणे


प्रतिबंधात्मक उपाय

-उंदरांचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न.

-साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा.

-प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>