अजनी चौकातील के.पी. इन हॉटेलमध्ये बोलावून तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी बंगळुरू येथील निर्यातदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बसवराज राजूर (वय ३०), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
बसवराज हा आयात-निर्यातदार आहे. पीडित तरुणी सीएच्या अंतिम वर्षाला असून ती धंतोली भागात राहाते. व्ही-चॅटच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मंगळवारी सकाळी बसवराज हा नागपुरात आला. तो हॉटेलमधील खोली क्रमांक ३०१मध्ये थांबला. त्यानंतर तो तरुणीच्या घरी गेला. सायंकाळी दोघांनीही एम्प्रेस मॉलमध्ये खरेदी केली. 'माझी प्रकृती अस्वस्थ आहे. तू हॉटेलमध्ये घरचे जेवन घेऊन ये', असे तो तरुणीला म्हणाला. रात्री ८.३० वाजता तरुणी त्याच्या रूममध्ये डबा घेऊन गेल्यानंतर त्याने जेवन केले. त्यानंतर बसवराव याने तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केला असता बसवराज याने तिला मारहाण करून तिच्याजवळील मोबाइल हिसकावला.
याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणी घरी आल्यानंतर बुधवारी सकाळी तिने नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांसह तरुणीने धंतोली पोलिस स्टेशन गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सी. के. मेसरे यांनी गुन्हा दाखल केला. लवकरच पोलिसांचे पथक बंगळुरूला जाण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट